गांडूळखत निर्मिती प्रत्येक शेतकऱ्याने करणे आवश्यक: डॉ.खिरारी

गेल्या काही दशकामध्ये पिक वाढीकरिता रासायनिक खताचा असंतुलित वापर केल्याने मातीचे आरोग्य बिघडले असल्याने जमिनीत सुधारणा करणेकरिता त्यामध्ये विविध सेंद्रिय खताचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. गांडूळ कल्चर, गांडूळपाणी व  गांडूळखत यासारख्या उत्पादनाचा वापर विक्रीसाठी केल्यास शेतकर्यांना निश्चितच फायदा होऊ शकतो  असे प्रतिपादन डॉ.प्रवीण खिरारी, विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्र) यांनी यावेळी बोलताना केले. ते बोंडे या गावात गांडूळखत निर्मिती प्रशिक्षणात प्रमुख मार्गदर्शक पदावरून बोलत होते.

सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतामध्ये कंपोस्ट खत, गांडूळखत, हिरवळीचे खत तसेच जीवाणूखतांचा वापर केल्यामुळे प्रमुख अन्नद्रव्याचा पुरवठा पिकास मिळतो व त्यामुळे पीकाचे  उत्पादन आणि  दर्जा या  दोन्ही बाबतीत सुधारणा दिसून येते. गांडूळखताचा वापर शेतात केल्यामुळे सुपीक माती बनते. जमिनीचे आरोग्यमानात सुधारणा झाल्यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य पिकास सहजरीत्या मिळतात. या अनुषंगाने कृषि विज्ञान केंद्र, साकोली अंतर्गत बोंडे या गावी गांडूळखत निर्मिती या विषयावर डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, साकोली यांचे मार्गदर्शनाखाली शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

गांडूळखताचे महत्व, गांडूळखत तयार करण्याची पद्धत, गांडूळखत तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, यासारख्या गांडूळखत निर्मितीविषयक विविध बाबींवर माहिती शेतकरी प्रशिक्षण या कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना दिली. यावेळी सदर कार्यक्रमामध्ये बोंडे या गावातील शेतकरी, महिला शेतकरी उपस्थित होते. कृषि विज्ञान केंद्र, साकोली मार्फत गांडूळखत तयार करण्यासाठी लागणारे प्लास्टिक गांडूळबेड हे यावेळी देण्यात आले. सदर कार्यक्रमात गांडूळखत निर्मिती कशी करावी याबाबतीत माहीती उपस्थित शेतकर्यांनी जाणून घेतली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता  बोंडे या गावातील महिला शेतकरी,शेतकरी,गावातील वरिष्ठ मंडळी तसेच कृषि विज्ञान केंद्र, साकोली येथील अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *