डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, साकोली येथे शिंगाडा लागवड तंत्रज्ञान विषयावर एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणाला भंडारा जिल्ह्यातीलच नव्हे तर गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते. सदर प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी कृषि भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री. शेषराव निखाडे होते. तर प्रशिक्षणाला डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख आणि डॉ. प्रशांत एस. उंबरकर, विषय विशेषज्ञ (किटकशास्त्र), कृषि विज्ञान केंद्र, साकोली हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यामध्ये सरासरी पर्जन्यमान १३३० मिमी असून ५७ पावसाचे दिवस असतात. भंडारा जिल्ह्याला तलावांचा जिल्हा सुद्धा म्हणतात. जिल्ह्यामध्ये बोड्या, तलाव मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान पिकाला पर्यायी पिक म्हणून शिंगाडा पिकाची लागवड करावी, ज्या खोलगट बांधीमध्ये पावसाळ्यात वाहून जाणारे जास्तीचे पाणी साचून ठेवता येत असेल, खोलगट बांधी किंवा ज्या शेतकऱ्यांकडे तीन – चार महिने पाण्याची उपलब्धता आहे, त्या शेतकऱ्यांनी शिंगाडा पिकाची आधुनिक तंत्रज्ञान वापरून लागवड करावी, पूर्व विदर्भात शिंगाडा पिकाचे क्षेत्र वाढविणे करिता तसेच शिंगाडा पिकाला पिक म्हणून मान्यता देणेकरीता शासन स्तराहून प्रयन्त होत आहेत, शिंगाडा हे पिक नवीन आहे परंतु जास्त नफा देणारे पिक असून याचे मानवी आरोग्याला खूप फायदे आहेत, तीन महिन्यात येणारे पिक असल्यमुळे शेतकऱ्यांनी शिंगाडा पिकाची लागवड करावी असे आवाहन डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी शेतकरी प्रशिक्षाना दरम्यान केले.
शिंगाडा पिकावरील किड व्यवस्थापन या विषयवार मार्गदर्शन डॉ. प्रशांत एस. उंबरकर, विषय विशेषज्ञ (किटकशास्त्र) यांनी केले. त्यामध्ये त्यांनी शिंगाडा पिकावर येणाऱ्या विविध किडीचीओळख, जीवनचक्र, किड व्यवस्थापनाच्या विविध पद्धती त्यामध्ये पिवळे चिकट सापळे, प्रकाश सापळा यांचा किड व्यवस्थापनामध्ये उपयोग, मेटाऱ्हायझिअम, बिव्हेरिया या सारख्या बुरशीजन्य किटकनाशकांचा वापर यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषि विज्ञान केंद्र, साकोली येथील अधिकारी कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.