डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, कृषि विज्ञान केंद्र, साकोली आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने शिंगाडा लागवड तंत्रज्ञान विषयावर शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन दि. २७ जून २०२४ रोजी सकाळी ११:०० वा. कृषि विज्ञान केंद्र, साकोली (भंडारा) येथे करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणामध्ये शिंगाडा लागवड पध्दत, नविन वाण, किड-रोग व्यवस्थापन, विपणन व्यवस्था, प्रक्रिया, मुल्यवर्धन अशा विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
भंडारा जिल्ह्यामध्ये सरासरी पर्जन्यमान १३३० मिमी असून ५७ पावसाचे दिवस असतात. जिल्ह्यामध्ये बोड्या, तलाव मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे धान बांधी, बोडी, व तलाव मध्ये या खरीप हंगामात लागवड करण्यास इच्छुक शेतकरी बंधू-भगिनींनी प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहून सुधारित तंत्रज्ञान जाणून घ्यावे असे आवाहन डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी केले आहे.