डॉ. पं.दे. कृ. वि. अकोला येथे शिवार फेरी आणि थेट पीक प्रात्यक्षिकांचा  लाभ घ्यावा डॉ. उषा डोंगरवार

       डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे विद्यापीठ स्थापना दिनाचे औचित्य साधून अकोला येथे यावर्षी विद्यापीठ शिवार फेरी दिनांक २० सप्टेंबर ते २२ सप्टेंबर, २०२४  या कालावधीत आयोजित करण्यात आली असून उद्घाटन समारंभ दिनांक २० सप्टेंबर, २०२४  रोजी सकाळी ११.००  वाजता प्रस्तावित आहे. विद्यापीठाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय ना. श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. तसेच या प्रसंगी विशेष अतिथी सन्माननीय ना. श्री शिवराज सिंग चौहान मंत्री कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि मुख्य अतिथी सन्माननीय ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व सन्माननीय ना. श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय ना. श्री. धनंजयजी मुंडे, कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य तथा प्रतिकूलपती (कृषी विद्यापीठे) प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. तसेच दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता  मुख्य अतिथी म्हणून मा. आमीर खान अभिनेता, संस्थापक पाणी फाउंडेशन व दिनांक २२  सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता  मुख्य अतिथी म्हणून मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री,  महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, अकोला यांची उपस्थिती असणार आहे.

 या शिवार फेरी तसेच थेट पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे  मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकरी, संशोधन,धोरणकर्ते  आणि उद्योग भागधारकांना ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी अत्याधुनिक कृषी पद्धतीबद्दल जाणून घेण्यासाठी आणि शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल पद्धतींची खात्री करून पीक उत्पादकता वाढवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे असून या तीन दिवसीय शिवार फेरीमध्ये खालील वैशिष्ट्यपूर्ण बाबींचा समावेश राहणार आहे.

  • ३०००  प्रगत खरीप पिक उत्पादन तंत्रांचे २५  एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी थेट पिक  प्रात्यक्षिके (उदा. तृणधान्य, कडधान्य, कापूस, सोयाबीन, भाजीपाला, फळपिके, फुलपिके, चारा पिके, धान पिके आणि त्याचे तंत्रज्ञान इत्यादी)
  • १०  खाजगी कृषी निविष्ठा कंपन्यांची थेट प्रात्यक्षिके.
  • विद्यापीठाच्या विविध संशोधन विभागांचे ११०० हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक क्षेत्र म्हणून पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील १,००,००० शेतकरी बांधवांचा सहभाग अपेक्षित राहील.
  • आपल्या प्रदेशातील कृषी क्षेत्रात समोरील आव्हाने आणि संधी यावर चर्चा सत्र..

शेतकऱ्यांची एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून जिल्हा निहाय कार्यक्रम सुनिश्चित करण्यात आला असून  त्या दिवशी त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्तिशः वा समूहाने यावे. भंडारा जिल्हा करिता २२  सप्टेंबर हा दिवस नियोजित आहे.

तरी  भंडारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, पुरुष व महिला शेतकरी, बचत गट, उत्पादक कंपनी उद्योजक यांनी  या शिवार  फेरीस  भेट द्यावी व उपस्थित रहावे व आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करावे असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र साकोली तर्फे करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *