अझोला लागवड तंत्रज्ञानावर पशु- सखीचे एक दिवशीय प्रशिक्षण

भंडारा जिल्ह्यात गाई व म्हशींचे प्रमाण जास्त असले तरी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता  कमी असल्याने पशुपालक पशुखाद्यात सुका चारा म्हणून निव्वळ तणसीचा वापर करतात. जनावरांना निकृष्ठ दर्जाची पोषणमुल्ये तणसीमधून मिळतात. त्याचा एकंदरीत परिणाम जनावरांच्या दुध उत्पन्नावर होतो. यावर पर्यायी उपाय म्हणून पशुखाद्यामध्ये हिरवा चाऱ्याचे प्रमाण वाढावे याकरिता कृषी विज्ञान केंद्र, साकोली येथे राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत  एक दिवसीय महिला पशु साखींचे प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते.

डॉ.प्रवीण खिरारी, विषय विशेषज्ञ, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र यांनी उपस्थित पशु सखींना अझोलाचे  जनावराच्या आहारातील महत्व, अझोलाचा शेळी, गाई, म्हशीकरीता खाद्य म्हणून वापर व त्याचे विविध फायदे, अझोला उत्पादन घेताना भेडसावणाऱ्या समस्या याविषयी माहिती देण्यात आली. तसेच अझोला लागवड करण्याकरिता कमी वस्तूंचा वापर करून अगदी सहज व सोप्या पद्धतीने तयार करता येते. पशुपालकांना खूप कमी खर्चात आणि स्वतःकडील  उपलब्ध असलेल्या जागेमध्ये अझोला तयार करता येणे शक्य आहे. त्यामुळे  पशुपालकांनी बाजारपेठेतील पशुखाद्यावरील नाहक होणाऱ्या खर्चात बचत करता येऊ शकते.

श्री.योगेश महल्ले महल्ले यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अझोला लागवड तंत्रज्ञानाचा वापर करून आपली आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन केले. शेतकऱ्यांनी प्रक्षेत्रावरील अझोला प्रात्यक्षिक युनिटला भेट देऊन  सर्व माहिती जाणून घेतली त्यानंतर या कार्यक्रमामध्ये उपस्थित महिला पशु सखींना अझोला प्रात्यक्षिक संबंधित निविष्ठांचे वाटप करण्यात आले. सदर प्रशिक्षणामध्ये मुंडीपार येथील महिला पशु सखींचा सहभाग होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published.