आज समाजात विविध क्षेत्रात स्वताच्या बळावर कर्तृत्व गाजवणाऱ्या विदर्भातील १६ महिलांची निवड करून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे महिला सक्षमीकरण स्त्री शक्ती उत्सव २०२३ अंतर्गत “ प्रेरणा “ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, यामध्ये भंडारा जिल्ह्यातून तुमसर तालुक्यामधील सौ. हर्षना दुर्गाप्रसाद वाहणे यांची “ आवळा शेती व प्रक्रिया उद्योग” मधील उल्लेखनीय कार्याकरिता त्यांची निवड करण्यात आली व त्यांचा “ प्रेरणा “ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कृषि विज्ञान केंद्र, साकोली च्या वतीने त्यांचे पुरस्कारा करिता नामांकन पाठविण्यात आले होते.
कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी मा. डॉ. शरदराव गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते. सौ. हर्षना दुर्गाप्रसाद वाहणे यांना मा. डॉ. शरदराव गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सौ. हर्षना दुर्गाप्रसाद वाहणे वय ४३ वर्ष ह्या मु. पो. तुमसर ता. तुमसर, जिल्हा. भंडारा येथील रहिवासी असून त्यांच्याकडे २० एकर शेतजमीन आहे. त्यांना निरनिराळे खाद्यपदार्थ तयार करण्याची आवड व प्राथमिकतेवर तयार केलेले पदार्थ, घराशेजारील परिसरात विक्री करणेची आवड असल्यामुळे त्यातून व शेतजमिनीतून शेती व्यवसायाला जोडधंदाची कल्पना डोक्यात आली, एकून जमिनीपैकी १५ एकर शेतात आवळ्याची लागवड त्यांनी केली, आवळ्यात आंतरपीक म्हणून पपई पिकाची लागवड केली, पपई व्यापाऱ्यांना विक्री करतांना त्यांना प्रती किलो 8 ते ९ रुपये भाव मिळाला परंतु बाजारामध्ये तीच पपई प्रती किलो ४० ते ५० रुपये बाजार भावाने विक्री व्यापारी करीत होते ते बघून त्यांना आवळ्याच्या बाजार भावाची चिंता वाटली, यावर आवळ्यावरती प्रक्रिया करून पदार्थ तयार करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. जीवनसत्वाचे गुणधर्म असलेल्या आवळ्याला ठोक बाजारात भाव नसल्याने त्यावर प्रक्रिया करून पदार्थ तयार करण्याच्या कल्पनेला त्यांनी आकारास आणले. त्यापासून स्वत: वेगवेगळे पदार्थ तयार करण्याचा निश्चय केला. फळावरील प्रक्रियेच्या एक महिन्याच्या प्रशिक्षणातून त्यांचा आत्मविश्वास वाढला. प्रशिक्षणाचा अनुभव व त्यावर कुटीर उद्योग विभागातून मिळालेल्या आर्थिक सहाय्याच्या मदतीने स्वत:च्या फार्ममधून १० प्रकारचे पदार्थ तयार करून बाजारपेठेत आवळ्याचे लाडू, अचार, मुरंबा, स्वीट कॅन्डी, मसाला कॅन्डी, आवळा पावडर, आवळा पाचक सुपारी, आवळा रस, मुखशुद्धी, व सरबत अशी दहा उत्पादने तयार करून, विक्रीकरिता महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये पाठवीत आहेत. यामधून त्यांना प्रती वर्ष 8 ते १० लाख रुपये नफा आवळ्याच्या उद्योगातून मिळत आहे. यापूर्वी त्यांचा कृषि विज्ञान केंद्र, साकोली च्या वतीने जागतिक महिला दिनाच्या दिवशी त्यांना शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार तर कृषी विभाग भंडारा यांचेकडून वैनगंगा कृषी महोत्सव महोत्सव मध्ये स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे. सौ. हर्षना वहाने यांना कृषि विज्ञान केंद्र, साकोली येथील शास्त्रज्ञ वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन करीत असतात.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराकरिता कृषि विज्ञान केंद्र, साकोली येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, डॉ. उषा आर डोंगरवार, यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, कृषि विज्ञान केंद्र साकोली येथिल सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांना पुढील वाढचाली करीता शुभेच्छा दिल्या आहेत.