धानावरील खोडकिडीचे  वेळीच व्यवस्थापन करा : कृषि विज्ञान केंद्र, साकोली

धान पिकावरील खोडकिडीचा प्रादुर्भाव भविष्यात वाढू नये या करिता वेळोवेळी शेतीची पाहणी करून वेळीच व्यवस्थापन करावे असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, डॉ. उषा डोंगरवार आणि विषय तज्ञ (पिक संरक्षण) डॉ. प्रशांत उंबरकर यांच्या कडून करण्यात आले आहे.

          पूर्व विदर्भामधील धान हे प्रमुख पिक आहे. धानाच्या कमी उत्पादकतेच्या विविध कारणापैकी या पिकावर येणाऱ्या किडी हे एक प्रमुख कारण आहे. या पिकावर रोपे तयार करण्यापासून ते धान कापणी पर्यंत विविध किडींचा प्रादुर्भाव होत असतो. पिकाची फेरपालट होत नसल्यामुळे तसेच विविध किडींचा पर्यायी खाद्य वनस्पती उपलब्ध होत असल्यामुळे या किडीच्या पिढ्या अखंड उपजीविका करत असतात.  खोडकिडा,  ही एक अतिशय महत्वाची आणि आर्थिक नुकसान करणारी किड आहे. त्यामुळे धान पिकावरील नुकसानकारक किडींची ओळख आणि आवश्यकतेनुसार व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

खालील प्रमाणे किडीचे व्यवस्थापन करावे:

  • खोडकिडा प्रतिकारक धानाच्या जातींची उदा. साकोली-८, सिंदेवाही-५ या वाणांची लागवड करावी.
  • रोवणीपुर्वी रोपांची मुळे क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही १० मि. ली. प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात तयार केलेल्या मिश्रणात १२ तास बुडवून ठेवावीत व नंतर रोवणी करावी.
  • ट्रायकोग्रामा जॅपोनिकाम हे परोपजीवी किटक हेक्टरी ५०,००० या प्रमाणात दर ७ दिवसाच्या अंतराने ३ ते ४ वेळा सोडावे. सोडण्यापूर्वी व सोडल्यानंतर ३ ते ४ दिवस रासायनिक किटकनाशकाची फवारणी करू नये.
  • शेतात ५ टक्के किड ग्रस्त फुटवे दिसताच अॅझाडीरेक्टीन ०.१५ टक्के ३० ते ५० मि.ली. किंवा क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २६ मि.ली. किंवा कार्बोसल्फान २५ टक्के १६ मि.ली. प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी किंवा कर्बोफ्युरॉन ३ टक्के दाणेदार २५ कि./हे. किंवा फिप्रोनील ०.३ टक्के दाणेदार १६.६७ कि./हे. याप्रमाणे बांधीमध्ये टाकावे. रासायनिक किटकनाशक वापरतांना सुरक्षेची सर्व काळजी घेऊनच वापर करावा.
  • धानाची कापणी जमिनी लगत करावी.
  • धान कापणी नंतर वापसा असतांना नांगरणी करून धसकटे गोळा करून नष्ट करावी.

 

Leave a Reply

Your email address will not be published.