नैसर्गिक शेती काळाची गरज : डॉ. उषा डोंगरवार

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, साकोली मार्फत भंडारा जिल्ह्यामध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या सुचनेनुसार नैसर्गिक शेती या विषयावर प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले. अलीकडच्या काळात झटपट उत्पादन मिळवण्याच्या नादात रासायनिक खते तसेच किटकनाशके यांचा अति वापर होऊ लागल्याने निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे. त्यामुळे निसर्गाला आपलेसे करत नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंब केल्यास पर्यावरणाचे संतुलन योग्य राहील. नैसर्गिक शेतीमागचा पायाभूत विचार म्हणजे बाह्य निविष्ठाचा वापर कमी करून त्याच बरोबर उत्पादन वाढ साध्य करणे हे आहे. नैसर्गिक शेती बाबतीत शेतकऱ्यांना माहिती मिळावी या करिता प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.

          डॉ. उषा डोंगरवार, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी नैसर्गिक शेती चे महत्व विषद करत नैसर्गिक संसाधने वापरून जमिनीची पोत उत्तरोत्तर सुधारली जाईल आणि आपल्याला विषमुक्त अन्न धान्य मिळेल व त्यासोबतच शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चात बचत होईल. नैसर्गिक निविष्ठामुळे पिक निरोगी आणि उत्पादन भरपूर मिळेल. असे प्रतिपादन केले.

          डॉ. प्रशांत उंबरकर, शास्त्रज्ञ (किटकशास्त्र) यांनी किड व्यवस्थापन करतांना निंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क तयार करण्याविषयी माहिती दिली तसेच किड व्यवस्थापानामध्ये कामगंध सापळे आणि चिकट सापळ्यांच्या वापराविषयी उपस्थितांना प्रात्यक्षिक करून दाखविले.

          बीज प्रक्रिया व उगवण क्षमता तपासणी बाबत कृषि विज्ञान केंद्र, साकोली मार्फत सल्ला देण्यात आला. धान पिकामध्ये पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. बीज प्रक्रियेसाठी १० लिटर पाण्यात ३०० ग्राम मीठ (३ टक्के) या प्रमाणात द्रावण करून त्यात बी ओतावे. द्रावण स्थिर झाल्यानंतर तरंगणारे हलके रोगयुक्त बी चाळणीने काढून टाकावे. तळातील निरोगी बी २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत २४ तास वाळवावे. पेरणी पूर्व बियाण्यास थायरम (३ ग्राम/किलो) बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी.        

          कृषि विज्ञान केंद्र, साकोलीचे संपर्क शेतकरी श्री. कवडूजी शांतलवार हे नैसर्गिक शेतीचा अवलंब करून भाजीपाला, फळ पिके यांची लागवड करतात. त्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करून उत्पादित केलेल्या आंबा या पिकाची थेट विक्री ग्राहकापर्यंत करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी पुढाकार घेऊन बाजारपेठ उपलब्ध करून दिली. शेतकरी ते ग्राहक तसेच शेतकरी गट यांनी उत्पादित केलेल्या मालाला थेट ग्राहक अशी व्यवस्था उभी करण्याचे काम कृषि विज्ञान केंद्र, साकोली मार्फत करण्यात येत आहे. कार्यक्रमा दरम्यान फळमाशी सापळे, कामगंध सापळे, पिवळे चिकट सापळे उपस्थितांना देण्यात आले.     

          कार्यक्रम प्रसंगी प्रगतीशील शेतकरी श्री. राजेश गायधनी, श्री. बाबूरावजी पारधी व इतर शेतकरी आदींनी उपस्थिती दर्शविली.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *