अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. त्यामुळे खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या धान, तूर, सोयाबीन, कापूस, भाजीपाला पिके तसेच ईतर पिकांवरील किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी निंबोळी अर्काचा वापर अतिशय फायदेशीर आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये कडूनिंबाच्या झाडाला निंबोळ्या लागलेल्या असून त्या पावसाळा सुरु होण्यापूर्वी जमाकरून व्यवस्थितपणे साठवणूक करावी. जेणेकरून पिकांवरील किडींच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्काचा वापर करता येईल. यामुळे खर्चात बचत होऊन पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी निंबोळ्या गोळाकरून व्यवस्थितपणे साठवून ठेवा आणि येणाऱ्या खरीप हंगामात किड व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क तयार करून वापर करावा असे आवाहन डॉ. उषा आर. डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख आणि डॉ. प्रशांत एस. उंबरकर, शास्त्रज्ञ (किटकशास्र) कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा यांनी केले आहे.
महत्व:
- कडूनिंबाच्या झाडाला आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. या वृक्षाला कल्पवृक्ष म्हणूनसुद्धा ओळखले जाते. झपाट्याने वाढणारे कडूनिंबाचे झाड मुळचे भारतीय भूखंडातील आहे.
- महाराष्ट्रात कडूनिंब सर्वत्र आढळतात. या वृक्षाचा प्रत्येक भाग अतिशय उपयोगी आहे. अशा प्रकारचे बहु उपयोगी वृक्ष असल्यामुळे कृषि क्षेत्रात या झाडाला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
- महागड्या रासायनिक कीटकनाशकांचे अनेक दुष्परिणाम जगासमोर येत आहेत. अश्या रासायनिक कीटकनाशकांमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी जैविक कीटकनाशकांचा उदा. निंबोळी अर्काचा उपयोग करणे गरजेचे आहे.
- मानवी जीवास हानिकारक ठरणाऱ्या रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून त्याला पर्याय म्हुणुन निंबोळी अर्काचा वापर करणे काळाची गरज आहे.
- त्याशिवाय कीड व्यवस्थापनात आवश्यक मित्र कीटकांचा या रासायनिक कीटकनाशकामुळे नाश होतो. यामुळे हानिकारक किडींपासून पिकांचे नैसर्गिकपणे संरक्षण होत नाही.
- मनुष्याच्या बाबतीत रासायनिक कीटक नाशकांचे दुष्परिणाम दिसत असल्यामुळे अनेक राष्ट्रांनी अश्या हानिकारक रासायनिक कीटकनाशके वापरण्यास कायद्याने बंदी आणली आहे.
- कडूनिंब या वृक्षाचे शास्त्रीय नाव अझाडीराकटा इंडीका असे आहे.
निंबोळी अर्काचा किटकांवर होणारा परिणाम
- संशोधनातून आढळून आले की अनेक किडींवर निंबोळी अर्क परिणामकारक आहे.
- अमेरिकन बोंड अळी, गुलाबी बोंड अळी, पाने पोखरणारी अळी, उंट अळी, भुंगेरे, ढेकुण, पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकिडे व इतर अनेक प्रकारच्या किडींसाठी परिणामकारक आहे.
- त्याच बरोबर टोळधाड याकिडी साठी निंबोळी अर्क अतिशय परिणामकारक आढळून आले आहे.
- त्यामुळे कीटक अन्न खाण्यापासून परावृत्त होतात आणि भुकेने ते नष्ट होतात.
- निंबोळी अर्क परावृतक, भक्षण रोधक, अंडी घालण्यास व्यत्यय, प्रज्योत्पादनात व्यत्यय, कात टाकण्यावर परिणाम, किडीच्या वाढीवर परिणाम, प्रौढ किडीची उडण्याची क्षमता कमी होणे अशा प्रकारे किडींवर परिणाम होत असल्याचे आढळले आहे.
- किडींची जीवन साखळी मोडते.
वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणजे काय?
- अनेक झाडांमध्ये किडींचा प्रतिकार करण्याची आणि त्यांना दूर ठेवण्याची नैसर्गिक संरक्षणाची यंत्रणा असते.
- काही झाडांच्या प्रजाती किटकांना दूर ठेवणारे पदार्थ निर्माण करतात. काही वनस्पतीच्या पाना, फुलात, बियात, सालीत, मुळात व इतर भागात असे पदार्थ असतात.
- कडूनिंबाच्या झाडामध्ये सुद्धा असे पदार्ध असतात. कडूनिंबाच्या वृक्षाच्या बिया आणि पाना मध्ये अझाडीरेक्टीन, निंबीसीडीन, सालानीन इत्यादी घटक असतात आणि त्यांचा कीटकनाशक म्हणून उपयोग होतो.
- निंबोळी अर्क द्रावणाचा फवारणी करिता उपयोग फायदेशीर आढळून आलेला आहे.
- निंबोळी अर्काचा वापर केल्या मुळे किडीस अंडी घालण्यास प्रतीबंध, कीड रोधक, किडीस खाद्य प्रतीबंध व कीटकनाशक अशा विविध मार्गाने परिणाम करते.
निंबोळ्या गोळा करण्याची पद्धत:
- कडूनिंबाच्या झाडाला सामान्यतः वर्षातून एकदाच फळधारणा होते.
- झाडाच्या फांद्या हलविल्या की निंबोळ्या जमिनीवर गळून पडतात आणि गोळा करता येतात किंवा
- झाडाखाली पिकलेल्या पिवळ्या निंबोळ्याचा सडा पडलेला असतो. त्या गोळा करता येतात.
- काडी कचरा काढून टाका. गोळा केलेल्या निंबोळ्या व्यवस्थित जमा कराव्यात.
निंबोळ्या वाळविण्याची पद्धत:
- निंबोळ्या उन्हात कोरड्या जागेवर चांगल्या वाळेपर्यंत पसरून ठेवाव्यात.
- निंबोळ्याचा थर शक्य तेवढा पातळ ठेवावा.
- वाळविण्याची प्रक्रिया काळजीपूर्वक करावी. कारण व्यवस्थितपणे न वाळलेल्या निंबोळ्याना बुरशी लागू शकते.
- पावसाळ्यामध्ये निंबोळ्या बाहेर वळविल्या जात असल्यास पाऊस पडण्यापूर्वी त्या गोळा करून घरात आणून ठेवाव्यात.
निंबोळ्या साठवून ठेवण्याची पद्धत:
- अयोग्य प्रकारे साठवून ठेवलेल्या निंबोळ्याला बुरशी लागु शकते.
- निंबोळ्या पोत्यात किंवा टोपल्यामध्ये भरून हवेशीर जागेवर साठवून ठेवाव्या.
- हवाबंद प्लास्टिक पिशव्या किंवा डब्या मध्ये निंबोळ्या साठविणे अयोग्य आहे.
निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत:
१. उन्हाळ्यात (पावसाळ्याच्या सुरवातीस) निंबोळ्या उपलब्ध असताना जमा कराव्यात. त्या चांगल्या वाळवून साफ कराव्या आणि साठून ठेवाव्यात.
२. फवारणीच्या आदल्या दिवशी आवश्यक तितक्या निंबोळ्या कुटून बारीक कराव्या.
३. पाच किलो निंबोळी चुरा ९ लिटर पाण्यात (फवारणीचा आदल्या दिवशी सायंकाळी) भिजत टाकावा तसेच १ लिटर पाण्यात २०० ग्राम साबणाचा चुरा वेगळा टाकावा.
४. दुसऱ्या दिवशी सकाळी निंबोळ्याचा अर्क चाळणी/फडक्यातून चांगला गाळून घ्यावा. या अर्कात १ लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावे. हा सर्व अर्क ऐकून १० लिटर होईल एवढे पाणी टाकावे.
५. वर नुमूद केल्या प्रमाणे तयार केलेला १ लिटर अर्क ९ लिटर पाण्यामध्ये मिसळून ढवळावा व फवारणी साठी वापरावा. अशा प्रकारे निंबोळी अर्क फवारणीच्या दिवशी तयार करून वापरावा.
निंबोळी अर्क वापरण्याची पद्धत:
- फवारणी यंत्र वापरण्या अगोदर निंबोळी अर्काचे मिश्रण चाळणी/कापडाच्या सहाय्याने व्यवस्थित गाळून घ्यावे. नाहीतर मिश्रानमधील घन पदार्थ अडकून नोझल बंद होईल.
- एका प्लास्टिक बादलीच्या तोंडावर कापड बांधावे आणि त्यात हे मिश्रण ओतावे. त्यानंतर निंबोळी अर्काचा वापर करावा.
फवारणीची वेळ:
निंबोळी अर्काची फवारणी संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सायंकाळी चार वाजेनंतर करणे योग्य असते.