कृषि विज्ञान केंद्र, साकोली (भंडारा) इथे शिवार फेरी कार्यक्रमाचे आयोजन

दि. ०८.१०.२०२१  रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ४.०० वा. पर्यंत कृषि विज्ञान केंद्र, साकोली, कृषी संशोधन केंद्र, साकोली या प्रक्षेत्रावर विस्तार शिक्षण संचालनालय डॉ . पंजाबराव देशमुख कृषि विदयापीठ अकोला तर्फे “शिवार फेरी” चे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

            डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला निर्मित विविध धानाच्या कीड व रोग प्रतिकारक वाणांची लागवड  कृषि विज्ञान केंद्र, साकोली व कृषी संशोधन केंद्र, साकोली प्रक्षेत्रावर करण्यात आलेली आहे. सदर वाणांमध्ये पिडीकेवी साधना, पिडीकेवी तीलक, पिकेवी एचएमटी, SKLRR-1, साकोली ६, सिंदेवाही १, पिकेवी किसान, साकोली ९ यांचेसह इतर विविध वाणांची लागवड करण्यात आलेली आहे. हे वाण कीड व रोग प्रतिकारक आहेत.  शिवार फेरी कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सदर वाण  बघता येईल जेणेकरून सदर वाणांचा अवलंब शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये करता येईल.

सदर कार्यक्रमात डॉ . पंजाबराव देशमुख कृषि विदयापीठ अकोला निर्मित धानाचे विविध सुधारित वाणांची माहिती देण्यात येणार असून धान पिकावरील प्रमुख किडी व त्यांचे व्यवस्थापन याविषयी माहिती मिळणार आहे. याशिवाय  सदर वेळी रब्बी हंगामातील पिक लागवड, कीड व रोग व्यवस्थापन, रबी पिकातील शून्य मशागतीचे तंत्रज्ञान, कृषि क्षेत्रात विविध मोबाईल अँप्सचा वापर, रबी पिकाकरीता विविध औजारे व यंत्रे, रबी चारा  पिक लागवड तंत्रज्ञान, जिल्हा कृषी हवामान संदेश- गरज व फायदे  या विषयावर  शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन होणार आहे.

            कार्यक्रमात शेतकरी बंधूना धान पिकाचे विविध जाती/ वाण, प्रक्षेत्रावर प्रत्यक्ष शेतात उभा मशीनने पेरलेला आवत्या धान, विविध औजारे, आवत्या पेरणी मशीन, धानातील पेट्रोलवर चालणारे डवरण यंत्र, धान कापणी यंत्र, विविध तंत्रज्ञान, जनावरांचा पोषक चारा, शेळीच्या जाती, धान पिक लागवडीच्या विविध पद्धती, बघता येणार आहेत. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला निर्मित विविध प्रकाशने, कृषिसंवादिनी, मेटारायझीयम व बायोमिक्स, विक्री करिता उपलब्ध राहणार आहे.

            सदर शिवार फेरी कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील जास्तीस जास्त शेतकरी बंधूनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन  डॉ. उषा आर. डोंगरवार, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.