धानावरील कडा करपा रोगाच्या व्यवस्थापनाकरिता वेळोवेळी शेतीची पाहणी करून वेळीच व्यवस्थापन करावे असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा येथील डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख आणि डॉ. प्रशांत उंबरकर, विषय तज्ञ (पिक संरक्षण) यांच्या कडून करण्यात आले आहे.
धान पिकाच्या कमी उत्पादकतेच्या विविध कारणांपैकी या पिकावर येणारे रोग हे एक कारण आहे. यामध्ये धान पिकावर येणाऱ्या रोगांपैकी कडा करपा हा एक महत्वाचा रोग आहे. त्यामुळे धानपिकावरील कडा करपा रोगाचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
या जिवाणूजन्य रोगामुळे पाने टोकाकडून व कडेने करपतात म्हणून याला कडा करपा असे म्हणतात व यानंतर रोपे व पाने पिवळी पडून वळतात.
पोषक वातावरण: तापमान: २० ते २५ अंश सेल्सिअस, आद्रता: ७० टक्क्यांपेक्षा अधिक
प्रसार: बियाणे, रोगग्रस्त पेंढा, रोगग्रस्त भात खाचरातून वाहत असलेले पाणी आणि शेतातील धसकटे, तणापासून- रानटी भात, गवत, नागरमोथा ई., जोराचा वारा व सतत भारी पाऊस यामुळे एका रोपापासून संपूर्ण पिकात पसरतो. नत्र खताचा अतिरिक्त वापर केल्यास हा रोग गंभीर स्वरूप धारण करतो.
नुकसान: रोगामुळे सर्वसाधारणपणे ८ ते १० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. मात्र संवेदनशील वाणामध्ये पोषक वातावरणात उत्पादनामध्ये ७० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. लोंब्या बाहेर पडण्यापूर्वी या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनामध्ये घट होत नसली तरी दाण्याची प्रत खालावते. तांदळाचे दाने दाने तुटतात. त्यामुळे धानाला अपेक्षित दर मिळत नाहीत.
कडा करपा रोगाचे व्यवस्थापन:
- शेताचा बांध व धुरे कडक उन्हात वाळू द्यावेत तसेच तण मुक्त ठेवावेत.
- खोडवा पिक घेण्याचे टाळावे.
- रोपे पुनर्लागवडीनंतर दाने भरण्यापूर्वी १० दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात (प्रमाण प्रती १० लिटर पाणी)
- कॉपर सल्फेट पेन्टाहायड्रेट (६% एस.सी.) २० ग्रॅम किंवा कॉपर हायड्रॉक्साईड (५३.८ % डी.एफ.) ३० ग्रॅम किंवा स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट (९०%) अधिक टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड (१०% एस.पी.) (संयुक्त जीवाणू नियंत्रक) १.५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
- फवारणी करतांना सर्व सुरक्षेची काळजी घेऊनच फवारणी करावी.


