कृषी विज्ञान केंद्र, साकोली अंतर्गत उमरी येथे ‘ भूमी सुपोषण अभियान’ संपन्न  संतुलित खत वापराबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन

जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि पिकांचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर थांबवून संतुलित खत व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कृषी तज्ज्ञांनी केले. कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), साकोली अंतर्गत डॉ. उषा डोंगरवार, प्रमुख शास्त्रज्ञ व प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक उमरी गावामध्ये शेतकऱ्यांसाठी ‘ भूमी सुपोषण अभियान’ अतिशय उत्साहात संपन्न झाले. या विशेष मोहिमेत उमरी व परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहून जमिनीचे आरोग्य सुधारण्याबाबत तांत्रिक मार्गदर्शन घेतले.

या कार्यक्रमाला  प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र, साकोलीचे कृषी विस्तार शास्त्रज्ञ श्री. प्रमोद पर्वते आणि कृषी अभियांत्रिकी शास्त्रज्ञ श्री. योगेश महाल्ले उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरी गावचे सरपंच श्री. यशवंतजी कापगते लाभले होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अभियानाचा रीतसर प्रारंभ करण्यात आली.

‘ भूमी सुपोषण’ अंतर्गत माती परीक्षणावर अभियानाच्या पहिल्या सत्रात बोलताना कृषी विस्तार शास्त्रज्ञ श्री. प्रमोद पर्वते यांनी ‘नव भूमी सुपोषण’ या संकल्पनेचे महत्त्व पटवून दिले. बाजारातून महागडी खते विकत आणून शेतात अवाजवी प्रमाणात टाकल्याने जमिनी कडक होत आहेत आणि उत्पादन खर्च वाढत आहे. हा खर्च कमी करण्यासाठी आणि जमिनीचे सुपोषण करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण (Soil Testing) करून घ्यावे आणि जमिनीतील घटकांच्या कमतरतेनुसारच ‘नत्र, स्फुरद आणि पालाश’ या मुख्य अन्नद्रव्यांची मात्रा द्यावी, असा मोलाचा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला. नॅनो युरिया आणि आधुनिक शेती यंत्र बद्दल माहिती
कृषी अभियांत्रिकी शास्त्रज्ञ श्री. योगेश महाल्ले यांनी रासायनिक खतांवरील खर्च पन्नास टक्क्यांनी कमी करणाऱ्या ‘नॅनो युरिया’ आणि ‘नॅनो डीएपी’ सारख्या द्रव स्वरूपातील आधुनिक खतांचा वापर कसा करावा, याची माहिती शेतकऱ्यांना सांगितली. आधुनिक कृषी यंत्रांच्या साहाय्याने खतांची मात्रा पिकांपर्यंत अचूक कशी पोहोचवता येते, ज्यामुळे मजुरी आणि वेळ दोन्हीची बचत होते, याबद्दल त्यांनी तांत्रिक माहिती दिली. यासोबतच पेरीव धान लागवड बद्दल माहिती दिली. सेंद्रिय व जैविक खतांच्या वापरावर भर
केवळ रासायनिक खतांवर अवलंबून न राहता शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत आणि हिरवळीच्या खतांचा वापर वाढवून जमीन सुपीक बनवण्यावर या अभियानात विशेष भर देण्यात आला. जैविक खते जसे की, अझोटोबॅक्टर आणि पीएसबी (PSB) च्या बीजप्रक्रियेमुळे खतांची कार्यक्षमता कशी वाढते, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सरपंच श्री. यशवंतजी कापगते यांनीही गावात अशा सुपोषण अभियानाची अत्यंत गरज असून, शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांनी दिलेल्या सल्ल्याचा अवलंब करून प्रगतशील शेतीकडे वळावे, असे आवाहन केले.

कृषी विज्ञान केंद्र, साकोलीच्या या अभियानामुळे खतांच्या खरेदीपासून ते शेतात टाकण्यापर्यंतच्या अनेक चुकीच्या पद्धती दूर होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया उमरी येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक ग्रामपंचायत, कृषी मित्र आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Share:

Author: kvk-sakoli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *