डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, साकोली मार्फत रासायनिक खतांचा संतुलीत वापर याबद्दल शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून साकोली, भंडारा येथील कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांच्या चमूने दि. २२ ते २४ एप्रिल या कालावधीत सलग तीन दिवस कार्यक्षेत्रातील विविध भागात क्षेत्रीय भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या दौऱ्यात कृषि विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. उषा डोंगरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पिक संरक्षण तज्ञ डॉ. प्रशांत उंबरकर, उद्यानविद्या तज्ञ कु. कांचन तायडे, विस्तार तज्ञ श्री. प्रमोद पर्वते, कृषि अभियंता तज्ञ श्री. योगेश महल्ले व पशु तज्ञ डॉ.प्रविण खिरारी या सर्व शास्त्रज्ञांनी भंडारा तालुक्यातील आमगाव, मोहाडी तालुक्यातील जांभोरा व किसनपूर तसेच साकोली तालुक्यातील वडद या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्व, मातीचा नमुना घेण्याची योग्य पद्धत, एकात्मक किड रोग व्यवस्थापन तसेच रासायनिक खतांचा संतुलीत वापर याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. आगामी खरिप हंगामासाठी धानाच्या सुधारित वाण, विविध पिकांची कलमे रोपे निवड व नियोजन या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शेत शिवार पाहणी दरम्यान शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय योजना सुचविण्यात आल्या. येणाऱ्या खरीप हंगामात आधुनिक तंत्रद्यानाचा अवलंब करावा असे आवाहन डॉ. उषा डोंगरवार यांनी केले.

