जलकुंभी या जलीय तणामुळे मत्स्य व्यवसायावर परिणाम

भंडारा जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये मत्स्य व्यवसाय केला जातो. जलकुंभी या जलीय तणाच्या प्रादुर्भावामुळे मत्स्य व्यवसायावर विपरीत परिणाम दिसून येत आहे.

श्रीमती. लिना फलके, उपजिल्हाधिकारी, भंडारा, डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, साकोली, डॉ. प्रशांत उंबरकर, विषय विशेषज्ञ (किटकशास्त्र), कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा यांनी केलेल्या पाहणीमध्ये जलकुंभी या जलीय तणाचा प्रादुर्भाव मेंढा गावालगतच्या वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून आला आहे. या प्रसंगी श्री. गणेश आग्रे, सरपंच, मेंढा, श्री. ढकल मेश्राम, श्री. रतिराम आग्रे, श्री. रामहरी शेंडे, श्री. नागेश देशमुख, श्री. मनोहर देशमुख, श्री. अर्जुन मेश्राम, श्री. भाऊराव मेश्राम, श्री. गोपाल मेश्राम उपस्थित होते.

जलकुंभी (वॉटर हायसिंथ) ही पाण्यावर तरंगणारी जलीय वनस्पती (तण) आहे.
जलकुंभीचे शास्त्रीय नाव : इचॉर्निया क्रॅसिप्स हे आहे. याचे मूळ स्थान ब्राझील आहे. २० व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात सर्वात अगोदर हे तण पश्चिम बंगालमध्ये शोभेच्या वनस्पती म्हणून वापरले जात होते. पण आता हे  भारतातील जलचरांसाठी सर्वात वाईट तण आहे. भारतामध्ये जवळपास ४ लक्ष हेक्टर क्षेत्र या तणाने व्यापले आहे. या तणाचा प्रसार बियाणे आणि व्हेजिटेटीवली (शाखीय प्रसार)  होतो.

जलकुंभीमुळे पाण्यातील ऑक्सिजन कमी होतो. त्यामुळे माश्यांच्या तसेच इतर जलचरांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. जलकुंभीमुळे बाष्पीभवनाची गती ३ ते ८ % अधिक वाढते. जलकुंभी ग्रसित भागात पाण्यात डासांची वाढ जलद होते.

जलकुंभीच्या नियंत्रणासाठी किडींचा उपयोग प्रभावी आहे तसेच अतिशय स्वस्त आणि किफायतशीर आहे. ही एक स्वचलित प्रक्रिया आहे आणि या किडींचा वापर एक वेळेस केल्यास पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही. या पद्धती मुळे इतर सजीवांवर तसेच वनस्पतींवर विपरीत परिणाम होत नाही. यामध्ये निओचेटीना ब्रूची व आईकोर्नी या दोन किडींच्या प्रजाती आहेत ज्या जलकुंभीचे जैविक पद्धतीने व्यवस्थापन करतात.

 

Share:

Author: kvk-sakoli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *