‘सेवा संकल्प अभियान’ या उपक्रमांतर्गत किसान गोष्ठी कार्यक्रमाचे आयोजन मथाडी ता. जि.भंडारा येथे करण्यात आले होते. डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, साकोली यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमामध्ये एकात्मिक किड व्यवस्थापन या विषयावर करण्यात आले. डॉ. प्रशांत उंबरकर (विषय विशेषज्ञ, किटकशास्त्र) यांनी धान पिकातील किडींची ओळख, त्यांचे प्रादुर्भावाचे स्वरूप तसेच किड नियंत्रणासाठी रासायनिक उपाययोजनांसोबतच जैविक व यांत्रिक पद्धतींचा योग्य वापर करण्याबाबत माहिती देण्यात आली. विशेषतः पिवळे व निळे चिकट सापळे यांचा वापर करून पिकातील किडींचे निरीक्षण व नियंत्रण कशा पद्धतीने करता येते, याचे सखोल मार्गदर्शन केले. धान पिकावर येणाऱ्या विविध किडींचे वेळीच व्यवस्थापन करून उत्पादनाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतींचा अवलंब करावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला मा. श्रीमती संगीता माने, (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा) यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. तसेच श्रीमती उर्मिता चिखले, (प्रकल्प संचालक आत्मा), श्री. जिभकाटे मंडळ कृषी अधिकारी, श्री. पद्माकर गिदमारे (उपविभागीय कृषी अधिकारी) आणि परीसरातील शेतकरी उपस्थित होते.
धान पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी नियमित पाहणी करणे, किडींची संख्या व परिस्थितीनुसार योग्य उपाययोजना करणे आणि अनावश्यक कीटकनाशकांचा वापर टाळणे याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. एकात्मिक किड व्यवस्थापनामुळे उत्पादन खर्च कमी करण्यासोबतच पिकाचे आरोग्य व उत्पादनक्षमता टिकविण्यास मदत होऊ शकते. आधुनिक तंत्रज्ञानासोबत स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या प्रभावी कृषी पद्धतींचा वापर केल्यास धान उत्पादक शेतकऱ्यांना अधिक शाश्वत व परिणामकारक पीक व्यवस्थापन करता येईल, असे यावेळी सांगण्यात आले.


