एकात्मिक पद्धत्तीने हरभरा पिकावरील घाटे अळीचे व्यवस्थापन करा

भंडारा जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील हरभरा हे एक महत्वाचे पिक आहे. या पिकामध्ये घाटे अळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नामध्ये घट येऊ शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी हरभरा पिकाचे सर्वेक्षण करून घाटे अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास व्यवस्थापनासाठी शिफारशी प्रमाणे उपाय योजना कराव्यात.  

हरभरा पिकावरील घाटे अळी

शास्त्रीय नाव: हेलीकोव्हार्पा आर्मिजेरा

अळीच्या अवस्था: अंडी, अळी, कोष आणि पतंग

ओळख: पूर्णपणे विकसित घाटे अळी पोपटी रंगाची आणि अळीच्या शरीराच्या दोन्ही बाजूवर करड्या रेषा आढळतात.  

नुकसान:  घाटे अळी ही हरभरा पिकावरील महत्वाची किड असून या किडीची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातून २ ते ३ दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरित द्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढूरकी होऊन वाळतात आणि त्यानंतर गळून पडतात. थोड्या मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण पाने व कोवळी देठे खातात. त्यामुळे झाडावर फक्त फांद्याच शिल्लक राहतात. पुढे पिक फुलोऱ्यावर आल्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढतो. घाटे अळी प्रामुख्याने फुले आणि घाट्यांचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळ्या घाट्याला छिद्र करून आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक अळी साधारणतः ३० ते ४० घाट्यांचे नुकसान करते.    

एकात्मिक किड व्यवस्थापन:

  • उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरणी केल्यामुळे किडींचे कोष पक्षी वेचून खातात किंवा ते सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतील.
  • हरभरा पेरणी करतांना मका किंवा ज्वारीचे बियाणे मधात फेकल्यामुळे नैसर्गिक पक्षी थांबे तयार होतात. शेतामध्ये मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबा म्हणून उपयोग करावा किंवा शेतामध्ये बांबूचे किंवा शेतात उपलब्ध कठ्याचे २० पक्षी थांबे प्रती हेक्टरी या प्रमाणात लावावेत.
  • हरभरा पिका भोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी.
  • घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी कामगंध सापळे (हेलील्युर) एकरी दोन किंवा हेक्टरी पाच या प्रमाणात लावावेत. झाडाच्या उंची पेक्षा एक फुट उंचीवर कामगंध सापळे लावावेत. सापळ्यामध्ये सतत तिन दिवस आठ ते दहा पतंग आढळल्यास व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.

पिकाचे निरीक्षण करून किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास घाटे अळीच्या व्यवस्थापनासाठी खालील किटकनाशक प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

  • पहिली फवारणी (पिक ५० टक्के फुलोऱ्यावर असतांना)

निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अँझाडीराकटीन ३०० पिपिएम ५० मिली किंवा

एच. ए. एन. पि. व्ही. (१ x १० पिओबी/मिली) ५०० एल.ई./हे.

  • दुसरी फवारणी (पहिल्या फवारणी नंतर १५ दिवसानी)

ईमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एस जी ४.४ ग्राम किंवा

क्लोरँनट्रानीलीप्रोल १८.५ टक्के एस.सी. २.५ मिली 

   सर्व शेतकरी बांधवांनी हरभरा पिकाचे सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार किड व्यवस्थापनाचे उपाय योजावेत असे आवाहन डॉ. उषा आर. डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख आणि डॉ. प्रशांत एस. उंबरकर, विषय विशेषज्ञ (किटकशास्त्र), कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा यांनी केले आहे.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *