पिकांमध्ये परपरागीभवन फार आवश्यक आहे व त्यात मधमाश्यांचा फार महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे पिकांची फळधारणा वाढते व परिणामी उत्पादन जास्त मिळते. परंतु मधमाशा वर्षभर आपल्या शेतात उपलब्ध व्हाव्यात य करिता त्यांची जीवनशैली व इतर सर्व बारकावे प्रशिक्षणाच्या माध्यमातून जाणून घेणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन श्री अनिल झोडे यांनी केले. ते कृषि विज्ञान केंद्र साकोली तर्फे आयोजित जागतिक मधुमक्षिका दिन प्रसंगी बोलत होते.
कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा, एम.सी.डी.सी., आणि नाबार्ड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० मे २०२२ रोजी शिवनीबांध येथे जागतिक मधुमक्षिका दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कृषि विज्ञान केंद्र, साकोलीच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. उषा डोंगरवार यांनी कृषि शेत्रातील मधमाशीचे महत्व विषद केले आणि शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी मधमाशांचा सहभाग याविषयी माहिती देऊन ग्रामिण भागातील युवक आणि महिलांनी शेती सोबतच मधुमक्षिका पालन हा शेती पूरक उद्योग सुरु करण्याचे आवाहन केले.
डॉ. प्रशांत उंबरकर, विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण) यांनी मधमाश्यांच्या विविध जाती, मधमाशीचे परागीभवनात महत्व सांगत मधमाशांची योग्य हाताळणी आणि नैसर्गिक पद्धतीने शुद्ध मधाची काढणी आणि मधुमक्षिका पालन उद्योग सुरु करण्याविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले. सोबतच नैसर्गिक शेतीचे महत्व विषद करून पिवळे चिकट सापळे वापरा संबंधी मार्गदर्शन करून उपस्थित शेतकरी बांधवांना प्रात्यक्षिक म्हणून पिवळे चिकट सापळे देण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये श्री. रामकृष्ण चांदेवार (सरपंच, शिवनीबांध), प्रगतीशील शेतकरी श्री. अमृत मदनकर, श्री. हंसराज हटवार, श्री. हंसराज झोडे, श्री. नीलकंठ कापगते यासोबतच ग्रामिण युवक आणि महिलांनी सहभाग नोंदविला.
श्री. योगेश महल्ले विषय विशेषज्ञ (कृषि अभियांत्रिकी) यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले आणि श्री विकास कटरे, एम. सी. डी. सी. यांनी उपस्थितांचे आभार मानले.