कृषि विज्ञान केंद्र, साकोली (भंडारा) तर्फे धान उत्पादक शेतकरी मेळावा व शिवार फेरी कार्यक्रम संपन्न

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला निर्मित धानाच्या विविध कीड व रोग प्रतिकारक वाणाचा अवलंब  करावा : डॉ. उषा डोंगरवार  

कृषि विज्ञान केंद्र, साकोली (भंडारा) तर्फे धान उत्पादक शेतकरी मेळावा व शिवार फेरी कार्यक्रम संपन्न

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला निर्मित धानाच्या विविध कीड व रोग प्रतिकारक वाणाचा वापर शेतकरी बंधूनी  करावा जेणेकरून कीड-रोगांचा कमीत कमी प्रादुर्भाव होऊन जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येईल, धानाच्या विविध वाणांची माहिती, धानाची पेरणी गादीवाफ्यावर करावी जेणेकरून पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करता येईल, बदलत्या हवामानाचा विचार करता कमी कालावधीच्या वाणांचा वापर करावा, पारंपारिक शेतीच्या जोडीला फळ, भाजीपाला पिकांची लागवड करून आपला आर्थिक स्तर उंचवावा, पेरीव धान लागवड ही फायदेशीर असून शेतकऱ्यांनी फोकीव पद्धतीने धान लागवड करू नये, येणाऱ्या रबी हंगामात कमी खर्चाचे तंत्रज्ञान/ शून्य मशागत तंत्रज्ञान अबलंब करून, उन्हाळी धानाला पर्यायी पिकांचा वापर असे प्रतिपादन डॉ. उषा डोंगरवार, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी केले त्या कृषि विज्ञान केंद्र, साकोली व महाराष्ट्र राज्य  ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  “धान उत्पादक शेतकरी मेळावा व शिवार फेरी” कार्यक्रमात बोलत होत्या.  कृषि विज्ञान केंद्र, साकोली व कृषि संशोधन केंद्र, साकोली,  प्रक्षेत्रावर विस्तार शिक्षण संचालनालय डॉ . पंजाबराव देशमुख कृषि विदयापीठ अकोला तर्फे “शिवार फेरी” चे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. सौ., वृषाली देशमुख, कृषी अधिकारी, साकोली, मा. छाया कापगते, कृषी अधिकारी, साकोली, मा. उषा आर. डोंगरवार, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, साकोली, मा.कमलेश बावनकुळे, महिंद्रा कृषी, भंडारा, श्री. अश्विन बन्सोड, तालुका अभियान व्यवस्थापक, उमेद, साकोली, सौ. सविता तिडके,  तालुका अभियान व्यवस्थापक, उमेद, लाखनी भंडारा यांचेसह कृषि विज्ञान केंद्र, साकोली येथील श्री. पी. पी. पर्वते, श्री. वाय. आर. महल्ले,  डॉ. एन. एस. वझिरे,  डॉ. पी बी खिरारी, श्री. लयंत अनित्य आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.  कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करून करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवार फेरी करण्यात आली यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला निर्मित विविध धानाच्या कीड व रोग प्रतिकारक वाणांची लागवड पाहणी, धान पिकाचे विविध जाती/ वाण माहिती, प्रक्षेत्रावर प्रत्यक्ष शेतात उभा मशीनने पेरलेला आवत्या धान, विविध औजारे, आवत्या पेरणी मशीन, धानातील पेट्रोलवर चालणारे डवरण यंत्र, धान कापणी यंत्र, विविध तंत्रज्ञान, जनावरांचा पोषक चारा, शेळीच्या जाती, धान पिक लागवडीच्या विविध पद्धती याविषयी शेतकऱ्यांनी पाहणी करून माहिती घेतली.

यानंतर डॉ. एन. एस. वझिरे, विषय विशेषज्ञ, कीटकशास्त्र कृषि विज्ञान केंद्र, साकोली, यांनी धान पिकावरील प्रमुख किड व रोगांचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले, रब्बी पिकातील बीजप्रक्रियेचे महत्व याविषयी माहिती दिली.

श्री. पी. पी. पर्वते,  विषय विशेषज्ञ, कृषी विस्तार, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी कृषि क्षेत्रात विविध मोबाईल अँप्सचा वापर याबाबत माहिती देऊन कृषि विज्ञान केंद्र, साकोली अंतर्गत असलेल्या सुविधांची माहिती दिली.

श्री. वाय. आर. महल्ले, विषय विशेषज्ञ, कृषी अभियांत्रिकी पेरीव धान लागवड पद्धत बाबत सविस्तर माहिती दिली तसेच रबी पिकाकरीता विविध औजारे व यंत्रे बाबत मार्गदर्शन केले.

डॉ. पी बी खिरारी, विषय विशेषज्ञ, पशुसंवर्धन यांनी रबी चारा  पिक लागवड तंत्रज्ञान बाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली.

श्री. लयंत अनित्य, विषय विशेतज्ञ, हवामानशास्त्र, यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जिल्हा कृषी हवामान संदेश- गरज व फायदे  या विषयावर मार्गदर्शन केले.  

मा.कमलेश बावनकुळे, महिंद्रा कृषी, भंडारा यांनी महिंद्रा कृषी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देऊन विविध औजारे बाबत माहिती दिली.

            सदर कार्यक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला निर्मित विविध प्रकाशने, कृषिसंवादिनी, टायकोडर्मा, मेटारायझीयम, बायोमिक्स विक्री करिता उपलब्ध करून देण्यात आलेले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रमोद पर्वते, विषय विशेषज्ञ, कृषि विस्तार यांनी केले तर आभार श्री. वाय. आर. महल्ले, विषय विशेषज्ञ, कृषी अभियांत्रिकी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता  श्री. कपिल गायकवाड कार्यक्रम सहायक (संगणक), श्री. गणेश गुसिंगे, श्री. मुकेश सुखदेवे, कु. आशा इडोळे, कु. प्रियंका जांभोळे, गीता बोरकर यांचे सहकार्य लाभले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *